कोरोना महासंकट : कोरोनाबाधित झालेल्या नागरिकांच्या १४७ इमारती पनवेल मध्ये सील केल्या आहेत :
पनवेल महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांचा आकडा २७ मे पर्यंत ४१९ वर गेला आहे.
पनवेल : पनवेल परिसरासह सिडको वसाहतीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा झपाट्याने वाढत आहे. विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता प्रशासनाकडून प्रयत्न केला जात आहे. महापालिकाकडून आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या नागरिकांच्या १४७ इमारती सील करण्यात आल्या आहेत. इमारत परिसरात नियमाचे पालन करून २८ दिवसांचा कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात येत आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून योग्य खबरदारी घेण्यात येत आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रातील कोरोना विषाणूबाधितांचा आकडा २७ मेपर्यंत ४१९ वर गेला आहे. यातून २५२ जण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. उर्वरित १४८ जणांवर उपजिल्हा रुग्णालय आणि एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर १९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पनवेल परिसरासह कळंबोली, कामोठे, खारघर, नवीन पनवेल, तळोजा परिसरात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणातआहे.
खारघर येथेही कोरोनाबधित रुग्णसंख्या अधिक आहे. कामोठे येथे कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे ८ मेपासून संपूर्ण शहर कंटेनमेंट झोन जाहीर केले आहे.आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिलासा देत एमजीएम रुग्णालय परिसर व औद्योगिक वसाहत वगळता मंगळवारी कंटेनमेंट झोन खुला करून दिला आहे.
संपूर्ण कंटेनमेंट झोनमुळे नागरिकांना अडथळे निर्माण होत असल्यामुळे यापुढे कोरोनाबाधित इमारतींना सील करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. याअगोदर कळंबोली, नवीन पनवेल, खारघर, तळोजा हा संपूर्ण परिसर कंटेनमेंट झोन जाहीर न करता, इमारती सील केल्या आहेत.
पनवेल महापालिका परिसरात बुधवारपर्यंत १४७ इमारती कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत परिसरातून ये-जा करण्यास मनाई आहे. २८ दिवसांचा कालवधी पूर्ण झाल्यानंतर कंटेनमेंट झोन खुले करण्यात येत आहेत.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजना परिसर इमारत :
पनवेल १४
नवीन पनवेल २४
कळंबोली २२
कामोठे ५७
खारघर २५
खारघर (घरकुल) ०४
तळोजा ०१
एकूण १४७
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.