Skip to main content

न्यूज अपडेट : कोरोना लस; ऑक्सफर्ड - अस्ट्राझेनकाच्या लशी बद्दल लोकांना खुशखबर:

न्यूज अपडेट : कोरोना लस; ऑक्सफर्ड - अस्ट्राझेनकाच्या लशी बद्दल लोकांना खुशखबर:



नवी मुंबई :- २०२१ च्या सुरुवातीला भारतामध्ये एकापेक्षा जास्त लशी उपलब्ध होऊ शकतील असं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटलंय. आता ऑक्सफर्ड विद्यापीठ- अस्ट्राझेनका मिळून तयार करत असलेल्या लशीच्या चाचण्यांमधून चांगली बातमी आली आहे.


ऑक्सफर्डच्या लशीचं उत्पादन पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट करणार आहे. या लशीसोबतच भारत सरकारने निर्माण केलेला टास्क फोर्स हा इतर औषध उत्पादक कंपन्यांसोबतही चर्चा करत असल्याचं हर्ष वर्धन म्हणाले आहेत.


जगभरात विविध देशांमध्ये कोरोना व्हायरसवरच्या लशीचं संशोधन सुरू आहे. यापैकी १० लशींच्या चाचण्या या तिसऱ्या आणि निर्णायक टप्प्यात आलेल्या आहेत. या लशी परिणामकारक आणि सुरक्षित आहेत का हे तिसऱ्या टप्प्यात सिद्ध होणं महत्त्वाचं आहे.


लस भारतात उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण मोहीम कशी राबवायची, यासाठीची योजना आखण्यात येत असल्याचंही हर्ष वर्धन यांनी म्हटलंय. सोबतच भारतामध्ये सध्या सुरू असणाऱ्या विविध लशींच्या चाचण्या आणि त्यांचे निकाल याची माहितीही आपण घेत असल्याचं हर्ष वर्धन म्हणाले आहेत.



ऑक्सफर्डच्या लशीचं काय झालं?


ऑक्सफर्ड - अस्ट्राझेनकाच्या लशीच्या चाचण्यांमध्ये अलिकडेच असं दिसून आलंय की तरुणांमध्ये तसंच वयस्कर लोकांमध्येही या लशीमुळे रोग प्रतिकारशक्ती-इम्युन रिस्पॉन्स निर्माण करते आहे. वयस्कर लोकांमध्ये याचे दुष्परिणामही कमी दिसत असल्यामुळे या लशीच्या परिणामकारकतेबद्दलच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.


वय वाढतं तशी शरीराची रोग प्रतिकारशक्ती कमी होत जाते, अशात या लशीमुळे वयस्कर प्रौढांनाही कोरोना व्हायरसपासून संरक्षण मिळालं तर तर कोव्हिडचा सामना करण्यात मोठी मदत होईल अशी आशा आहे. हीच लस भारतामध्ये सिरम इन्स्टिट्यूट तयार करणार असून ती 'कोव्हिशील्ड' या नावाने उपलब्ध होईल.


सिरम इन्स्टिट्यूट कोव्हिड-19 च्या लशीची तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी देशभरात सुरू झालेली आहे. सोबतच सिरम इन्स्टिट्यूट अधिकचे १० कोटी डोसेस तयार करणार आहे.


सिरम इन्स्टिट्यूटच्या लशीची तिसऱ्या टप्प्यातली चाचणी भारतभरातल्या १७ शहरांमध्ये केली जात आहे.


दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात मिळून एकूण १६०० स्वयंसेवकांना या लशीचा डोस देण्यात येणार असल्याचं ANI वृत्तसंस्थेने म्हटलंय.


पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेज, ससून हॉस्पिटल, भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज आणि जहांगीर हॉस्पिटलमध्ये या ट्रायल्स नियोजित आहेत.


तर मुंबईतील जी. एस. मेडिकल कॉलेज, केईएम हॉस्पिटल, टीएन मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलची निवड या चाचण्यांसाठी करण्यात आलेली आहे.


सिरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशील्ड लशीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या ट्रायलचे निकाल याच वर्षी नोव्हेंबर अखेर वा डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंत येण्याची अपेक्षा आहे.


या लशीचे १० कोटी अधिक डोसेस तयार करून ते २०२१ मध्ये भारतासोबतच लघु आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये देण्यात येणार असल्याचं सिरम इन्स्टिट्यूटने जाहीर केलंय.


गावी (GAVI) आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या मदतीने हे केलं जाणार आहे.


७३ दिवसात कोरोनाची लस उपलब्ध होईल, असं वृत्त भारतातील प्रसारमाध्यमांनी २२ ऑगस्टला दिलं होतं. मात्र ७३ दिवसात लस उपलब्ध होणार असल्याचं वृत्त चुकीचं असल्याचं सीरम इन्स्टिट्यूटने स्पष्ट केलं होतं.


सिरम इन्स्टिट्यूटनं म्हटलं की, या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. जेव्हा ही चाचणी पूर्ण होईल, तिला मान्यता मिळेल तेव्हाच तिच्या उपलब्धतेबद्दल माहिती दिली जाईल.


पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था कोव्हिड-19 आजारावरील लशीचे १० कोटी डोस २०२१ सालच्या सुरुवातीपर्यंत बनवणार असल्याची माहिती संस्थेचे प्रमुख अदर पुनावाला यांनी दिली होती.


भारतासह कमी राष्ट्रीय उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कोरोना लशीचे हे डोस पाठवले जाणार असल्याचं पूनावाला यांनी एका पत्रकाद्वारे सांगितलं होतं. यासाठी बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनची मदत घेतली जाणार आहे.



सिरम इन्स्टिट्यूटच्या लशीची किंमत २२५ रुपये


सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या पुण्यातल्या संस्थेने १० कोटी कोरोनावरील लशीच्या डोसेसची निर्मिती करण्यासाठी गावी (Gavi), बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन यांच्यासोबत करार केला आहे.


गेट्स फाऊंडेशनच्या स्ट्रॅटेजिक फंडमार्फत १५ कोटी अमेरिकन डॉलर्स या लशीच्या निर्मितीच्या कामात वापरले जाणार आहेत.


या लशीच्या प्रत्येक डोसची किंमत ३ अमेरिकन डॉलर म्हणजे २२५ रुपये असणार आहे. ९२ देशांमध्ये ही लस उपलब्ध करून देणार असल्याचंही सिरम इन्स्टिट्यूटने स्पष्ट केलं आहे.


भारतीय लशींच्या चाचण्यांचं काय?


भारतामध्ये विकसित करण्यात येणाऱ्या २ लशींच्या दुसऱ्या टप्प्याल्या चाचण्यांचे निकाल नोव्हेंबरच्या सुरुवातीला येणं अपेक्षित आहे. या टप्प्यातल्या चाचण्यांच्या निकालावरून या लशी कितपत सुरक्षित आहेत, हे ठरवलं जाईल.


इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च - ICMR आणि भारत बायोटेक मिळून तयार करत असलेलं 'कोव्हॅक्सिन' आणि झायडस कॅडिलाची 'ZyCovD' लस या दोन्ही लसींची दुसऱ्या टप्प्यातली चाचणी सध्या देशात सुरू असल्याचं या लसींवर लक्ष ठेवून असणाऱ्या गटाचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटलंय.


याविषयीच्या पत्रकारपरिषदेत बोलताना त्यांनी सांगितलं, "नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत आम्हाला दोन्ही लशींचे दुसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांचे निकाल मिळतील."


रशियाच्या लशीबाबत शंका आणि रशियन सरकारचं प्रत्युत्तर


आपण लस तयार केली असल्याचा दावा रशियाने ११ ऑगस्टला केला होता. दोन महिने मानवी चाचण्या करण्यात आल्यानंतर या लशीला मान्यता देण्यात आल्याचं रशियाकडून सांगण्यात आलं होतं.


पण इतक्या वेगाने लस तयार करण्याबद्दल तज्ज्ञांनी शंका उपस्थित केली होती. जर्मनी, फ्रान्स, स्पेन आणि अमेरिकेतल्या संशोधकांनी याबद्दल सावध राहण्यास सांगितलं होतं.


यानंतर रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांनी १२ ऑगस्टला इंटरफॅक्स वृत्तसंस्थेला सांगितलं, "असं वाटतंय की औषधाच्या या स्पर्धेत रशिया आघाडीवर असण्यातला फायदा आमच्या परदेशी सोबत्यांना लक्षात आला आणि म्हणून ते निराधार चर्चा करत आहेत."


राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मुलीला ही लस देण्यात आली होती. या लशीबद्दलचा पहिला अहवाल रशियन वैज्ञानिकांनी लॅन्सेट मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध केला.


ज्यांना ही लस देण्यात आली त्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये रोग प्रतिकारक शक्ती निर्माण व्हायला सुरुवात झाल्याचं प्राथमिक चाचण्यांमध्ये आढळल्याचं या अहवालात म्हटलंय.


या स्पुटनिक - V लशीची चाचणी ३८ स्वयंसेवकांवर घेण्यात आल्याचं लॅन्सेटमधल्या या रिपोर्टमध्ये म्हटलंय. पण रशियामध्ये कोणत्याही चाचण्यांचे निष्कर्ष येण्यापूर्वीच या लशीच्या वापराला मान्यता देण्यात आली होती.


रशियाचा दावा, दोन आठवड्यांत येणार लसीची पहिली बॅच


पुतिन यांची मुलगी कोण आहे, जिला पहिली कोरोना लस देण्यात आली?



आणखी कुठे काय प्रयत्न सुरू आहेत?


कोरोना व्हायरसवरची लस शोधण्याचं काम जगभरात अतिशय वेगाने सुरू आहे. सुमारे २४० लशी सध्या विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहेत, ४० लशींच्या क्लिनिकल ट्रायल्स सुरू आहेत आणि ९ लशींचं काम हे शेवटच्या टप्प्यात आलं असून हजारो जणांवर या लशींच्या चाचण्या घेण्यात येताहेत.


जगातल्या प्रमुख लशींचे अपडेट


ऑक्सफर्ड विद्यापीठ तयार करत असलेल्या लसीमुळे रोग प्रतिकारशक्ती कार्यान्वित होत असल्याचं चाचण्यांमधून सिद्ध झालंय.


या लशीखेरीज युकेमध्ये आणखी एका लशीची चाचणी सुरू आहे. अमेरिकेतल्या नोव्हावॅक्स या औषध उत्पादक कंपनीने ही लस विकसित केली आहे. ही लस व्यक्तीच्या शरीरातल्या रोग प्रतिकार शक्तीला कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी तयार करेल.


अमेरिकेत मॉर्डना व्हॅक्सिनची चाचणी सुरू आहे. या चाचणीमध्ये मे महिन्यात सहभागी झालेल्या सुरुवातीच्या ८ जणांच्या शरीरात लशीचा डोस दिल्यानंतर कोरोना व्हायरसशी लढू शकतील अशा अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत.


चीनमध्ये ट्रायल सुरू असणारी लस सुरक्षित असल्याचं सिद्ध झालंय. सोबतच या लशीमुळे संरक्षण पुरवणाऱ्या अँटीबॉडीज तयार होत असल्याचं निष्पन्न झालंय. चीनच्या लष्कराला ही लस देण्यात येत आहे.


पण यापैकी कोणती लस नेमकी किती प्रभावी ठरेल, हे आताच सांगता येणार नाही.


लस कशी बनते?


मानवी शरीरातील पांढऱ्या पेशींचा रोग प्रतिकारकशक्तीमध्ये सहभाग असतो. शरीरात अत्यंत कमी प्रमाणात व्हायरस किंवा बॅक्टेरिया सोडण्यात येतो. शरीरातील संरक्षण यंत्रणा या व्हायरसला किंवा बॅक्टेरियाला ओळखते, तेव्हा त्याच्याशी कसं लढायचं हे शरीराला कळतं.


पुढच्या वेळी शरीरात पुन्हा अशा प्रकारचा व्हायरस आल्यास त्याचा सामना करण्यासाठी आपल्या शरीराची तयारी असते.


गेल्या अनेक दशकांपासून एखाद्या विषाणूवर तयार करण्यात आलेल्या लसीकरणात त्याच विषाणूचा वापर होत आलेला आहे.


गोवर, देवी, कावीळ अशा रोगांसाठी अशाच प्रकारच्या लसींचा वापर केला जातो. तसंच फ्लूवरच्या लसीकरणातही याचा वापर होतो.


पण कोरोना व्हायरसवर लस बनवण्यासाठी नव्या पद्धतीचा वापर करण्यात येत आहे. याचे जेनेटीक कोड उपलब्ध असून याचं परीक्षण होणं बाकी आहे. जेनेटीक कोडचा काही भाग घेऊन लस बनवण्याच्या प्रयत्नात शास्त्रज्ञ आहेत.


कोरोनावरच्या लशीची आवश्यकता का आहे?


कोरोना व्हायरसचा प्रसार सध्या जगभरात वेगाने होतोय आणि सध्या जगातली बहुतांश लोकसंख्या या व्हायरसच्या विळख्यात येण्याची भीती आहे. लशीमुळे लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्यामुळे शरीरात आलेल्या व्हायरसचा नायनाट होतो.


ज्याला लस टोचली आहे तो कधी आजारीच पडत नाही. यामुळे सध्या लशीचा शोध लागणं अत्यावश्यक आहे.


किती लोकांना कोरोनावरच्या लशीची गरज आहे?


या वर्षांतला आणि कदाचित या शतकातला हा खूप गंभीर प्रश्न आहे. सध्याची जगाची कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली अवस्था पाहता जगातल्या ६० ते ७० टक्के लोकांना त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लशीची गरज आहे.


जर, कोरोनावर लस उपलब्ध झाली आणि ती परिणामकारक ठरली तर जगातल्या काहीशे अब्ज लोकांना ही लस टोचावी लागेल.


प्रथम लस कोणाला टोचली जाईल?


त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यांत ही लस कोणाला टोचावी याची आखणी करावी लागेल. यात प्रथम कोव्हिड-19 रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस टोचावी लागेल. तसंच, ही लस जर सर्व वयोगटातल्या लोकांवर परिणामकारक ठरणारी असेल तर तिचा दुसऱ्या टप्प्यांत वापर वृद्ध किंवा ५० वर्षांच्यावरील लोकांवर करावा लागेल.


कारण, या वयोगटातील लोकांचं कोव्हिड-19 मुळे आजारी पडण्याचं मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण मोठं आहे. तसंच, वृद्धांची काळजी घेणाऱ्या त्यांच्या निकटवर्तियांनाही ही लस यावेळी टोचावी लागेल. त्यानंतर जसं लशीचं उत्पादन वाढेल तशी ती सगळ्यांसाठी उपलब्ध होईल.


लस कशी काम करेल?


ऑक्सफर्ड विद्यापीठात सुरू असलेल्या प्रयोगाला युकेच्या सरकारनेही पाठिंबा दिलाय. पण ब्रिटीश सरकारने हा प्रयोग यशस्वी होईलच याची खात्री नाही असं स्पष्ट केलंय. पण ही लस नेमकी काम कशी करते?


शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसच्या पृष्ठभागावर असलेल्या टोकदार भागातली गुणसूत्रं काढून ती दुसऱ्या निरुपद्रवी विषाणूमध्ये सोडली आहेत. यातून ही लस तयार होतेय. ही लस शरीरात टोचली की ती पेशींमध्ये जाते. आणि मग शरीरात कोरोना व्हायरसच्या स्पाईक प्रोटिनची निर्मिती सुरू होते.


या प्रक्रियेत शरीरातली प्रतिकारशक्ती वाढते आणि मग रुग्णाच्या शरीरात अँडीबॉडीजची निर्मिती सुरू होते. या प्रक्रियेदरम्यान T सेलही कार्यरत होतात. थोडक्यात काय तर आपल्या शरीरातल्या पेशी कोरोना व्हायरसला ओळखतात आणि मग त्या व्हायरसचा नायनाट करतात.


लशीच्या यशाची खात्री किती?


ब्रिटिश सरकारप्रमाणेच जगभरात इतर ठिकाणी जिथे लशीवर काम सुरू आहे त्यातल्या कोणीही खात्री दिलेली नाही की ही लस परिणामकारक ठरेल. यात एक भीती अशीही व्यक्त केली जातेय की या लशीच्या प्रयोगांमुळे या रोगाचा संसर्ग अधिक होऊ शकतो.


पण ऑक्सफर्डच्या शास्त्रज्ञांना तशी भीती वाटत नाहीये. ज्या महिलेवर याचा सर्वप्रथम प्रयोग झाला तिचा मृत्यू झाल्याच्या अफवाही उठल्या होत्या.



पण लशीवर संशोधन होण्यापासून ती लस बाजारात येईपर्यंत यात अनेक टप्पे आहेत.


●  चाचणीतून हे सिद्ध व्हावं लागेल की तयार झालेली लस सुरक्षित आहे.


●  लशीमुळे लोकांच्या प्रतिकारशक्तीला कोरोनाच्या विषाणूला प्रतिसाद देता आला पाहिजे. लोकांची प्रकृती यामुळे आणखी खालावणार नाही याचीही खातरजमा करावी लागेल.


औषधं प्रमाणित करणाऱ्या संस्थांनी या लशीला हिरवा कंदील दाखवावा लागेल.


लशीचे अब्जावधी डोस कसे बनवता येतील याचीही तजवीज करावी लागेल.


आणि जगभरातल्या कोरोना बाधित लोकांपर्यंत ही लस पोहोचेल यासाठी पुरवठा यंत्रणा सक्षम करावी लागेल.


लस होईपर्यंत काय करावं?


लसीकरणामुळे माणूस आजार होण्यापासून वाचतो, हे खरं आहे. पण कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी स्वच्छता राखणं सर्वांत महत्त्वाचं आहे.


सुरक्षित अंतर पाळणं म्हणजेच सोशल डिस्टंन्सिंग, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणं या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. याशिवाय लक्षणं आढळल्यानंतर ताबडतोब पावलं उचलणं आणि सूचनाचं पालन करून आयसोलशेन वा क्वारंटाईन होणंही गरजेचं आहे.


 


 


 


 


महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे