न्यूज अपडेट: शिवजयंती साध्या पध्दतीने साजरी करण्याचे निर्देश;आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले:
पनवेल (प्रतिनिधी) :- कोव्हीड-१९ मुळे निर्माण झालेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करून ३१ मार्च तिथीनुसार होणारी ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ साधेपणाने साजरी करण्याच्या सूचना राज्य शासनाच्यावतीने देण्यात आल्या आहेत. यालाच अनुसरून पनवेल महानगरपालिकेने शहरातील शिवजयंती मंडळानी यावर्षीचा शिवजयंतीचा उत्सव साधेपणाने साजरा करावा असे आवाहन आयुक्त श्री. सुधाकर देशमुख यांनी केले आहे.
कोरानाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कोणत्याही प्रकारच्या बाईक रॅली, प्रभात फेरी, मिरवणुका काढण्यात येऊ नये. त्याऐवजी शिवजयंती दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला किंवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करावे. कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे व्याख्यान, गाणे, नाटक, असे सादरीकरण किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क किंवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.
शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक शिबिरे, उपक्रम आयोजित करण्यास शिवजयंती मंडळांनी प्राधन्य द्यावे. त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. यावेळी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम जसे की मास्क, सॅनिटायझर वापरण्याचे विशेष लक्ष देण्यात यावे. असे निर्देश शासनाच्यावतीने देण्यात आले आहे. या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी असे आदेश पालिका श्री. आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.