न्यूज अपडेट: पनवेल महानगरपालिकेच्या सर्व साधारण सभेत विविध विषयांना मंजूरी:
पनवेल (प्रतिनिधी/प्रदीप पाटील) :- पनवेल महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा 20 जुलै 2021 रोजी महापालिकेच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पुन्हा एकदा रूजू झाल्याबद्दल आयुक्त श्री. गणेश देशमुख यांचा महासभेच्यावतीने सत्कार करण्यात आला. तसेच सचिव तिलकराज खापर्डे हे निवृत्त होत असल्याने त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
प्रश्नोत्तरांच्यावेळी ई टॉयलेट व फूटपाथवरील वाचानालय या विषयावरती चर्चा करण्यात आली-
पनवेल महानगरपालिकेमार्फत (कोविड19) उद्भवणाऱ्या संसर्गजन्य रोगाने बाधित रुग्णांवर उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालय येथील विलगीकरण कक्ष, इंडिया बुल्स् येथील विलगीकरण केंद्र आणि जम्बो कोव्हिड सेंटर येथे उपचारासाठी आलेल्या रूग्णांना अल्पोपहार पुरविण्याच्या विषयाला महासभेने चर्चा करून मान्यता दिली.
महानगरपालिका हद्दीतील घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया करणेकामी शासनाकडून खानाव येथील गट क्र.83 - अ ची जागा मिळणेबाबत व शासन निर्देशाप्रमाणे विकसित करणे या विषयावर चर्चा करून हा विषय मंजूर करण्यात आला.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.